Uncategorized

मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ

विशेष सहाय्य योजनांचा गावोगावी प्रचार

गडचिरोली : जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून या मल्टीमीडिया चित्ररथाला रवाना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, संजय गांधी योजनेचे तहसीलदार मोहनिश शेलवटकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभर सुरू असलेल्या या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दुर्गम व अतिदुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

या अभियानासाठी विशेषतः मोबाईल एलईडी व्हॅनचा वापर करण्यात आला आहे. दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केलेला माहितीपट या व्हॅनद्वारे दाखवण्यात आला. तसेच, लाभार्थ्यांना माहितीपत्रके वाटप करून योजनांविषयी जागरूक केले जात आहे.

राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा प्रमुख योजनांसह केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे केला जात आहे.

योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पोर्टलद्वारे जमा केला जातो. यासाठी लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत असणे आणि ते त्यांच्या बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्याचे आणि बँक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. त्यामध्ये आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत. ही कागदपत्रे पुढील सात दिवसांच्या आत तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात सादर करावीत. आधार बँक खात्याला जोडले नसल्यास किंवा अद्ययावत न केल्यास लाभ बंद होऊ शकतो.

गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य सरकार विशेष सहाय्य योजना राबवत आहे. कोणत्याही लाभार्थ्याला सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांना त्यांचा लाभ थेट खात्यात मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या योजनांचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button