महाशिवरात्र निमित्त मार्कंडा येथे शिवभक्तांचा जनसागर;शासनाच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे भाविकांना उत्तम सुविधा

गडचिरोली:विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर हजारो भक्तगणांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली. या मंगलमय सोहळ्याची सुरुवात आमदार डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. वैशाली नरोटे आणि हरणघाट हनुमान मंदिराचे संत मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महापूजेने झाली. या पूजेसाठी पुजारी पंकज पांडे, शुभांगी पांडे, प्रफुल भांडेकर, वैशाली भांडेकर, संतोष दीक्षित आणि सौ. दीक्षित हे यजमान होते. मंत्रोच्चारांच्या गजरात पुजारी नाना महाराज आमगावकर यांनी विधिवत पूजा संपन्न केली.
या कार्यक्रमास चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव, गट विकास अधिकारी सागर पाटील, नायब तहसीलदार तारेश फुलझेले, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी पाटील तिवाडे, तसेच स्थानिक प्रशासन आणि विविध मान्यवर उपस्थित होते. याशिवाय माजी आमदार डॉ. देवराव होळी, दिलीप चलाख, जयराम चलाख यांनीही मंदिरात येऊन दर्शन घेतले.
शासनाच्या सहभागाने भाविकांना उत्तम सुविधा
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मार्कंडादेव येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यांची लांबी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पोहोचली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी उत्कृष्ट सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या. स्तनदा माता, अपंग व्यक्ती, गरोदर महिला आणि वृद्ध भक्तांसाठी विशेष सोय केली गेली होती. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभागाचे पथक भाविकांच्या सोयीसाठी तैनात ठेवण्यात आले आहे. यासोबतच महापूजेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह दर्शन) उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून प्रत्यक्ष मंदिरात हजर न राहू शकणाऱ्या भक्तांना घरबसल्या दर्शन घेता येईल.
शिवभक्तांचा उत्साह
महाशिवरात्र हे मार्कंडादेव मंदिरासाठी विशेष पर्व असून, मागील तीन दिवसांपासून येथे लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. दर्शनासाठी हजारो शिवभक्तांनी सहनशीलतेने रांगेत उभे राहून आपल्या श्रद्धेचा भाव व्यक्त केला.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय न होता दर्शन घेता आले. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने आणि भक्तांच्या उत्साहाने गजबजून गेला होता.