जीडीपीएल क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीच्या गुणवंत खेळाडूंसाठी सुवर्णसंधी ठरावी:भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री

गडचिरोली:लाईड्स मेटल्स तर्फे आयोजित जी डीपीएल क्रिकेट स्पर्धा ही गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंना समोर आणून राष्ट्रीय स्तरावर त्यांना या माध्यमाने ओळख निर्माण करून देणारी ठरावी . जिल्ह्यात एवढी भव्य, देखणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाईल, असा कधीच विचार केला नव्हता. पण इथे आल्यावर या स्पर्धेचे स्वरूप पाहून भारावलो. या जिल्ह्यातील खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे, परीश्रम घेण्याची सवय आहे. त्यामुळे एक दिवस गडचिरोली जिल्ह्याचा खेळाडू निश्चितच भारतीय क्रिकट संघात दिसेल, असा आशावाद सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली.
लॉयड्स मेटल्स अॅंड एनर्जीच्या वतीने बुधवार (ता. ५) स्थानिक एमआयडीसी मैदानावर ‘लॉयड्स मेटल्स गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग’ (जीडीपीएल)क्रिकेट (लेदर बॉल) स्पर्धा प्रारंभ झाली. जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या भव्य ऐतिहासिक स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची विशेष उपस्थिती होती.
या भव्य स्पर्धेसाठी एमआयडीसीच्या मैदानावर विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी चहुबाजुंनी प्रेक्षक गॅलरी आहे. रात्री सामने होणार असल्याने हाय व्होल्टेज फ्लड लाईट्स उभारण्यात आले आहेत. तज्ज्ञ क्युरेटर्सद्वारे तीन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. विशेष निमंत्रितांसाठी वेगळी आसन व्यवस्था, हिंदी, मराठीतील नामवंत समालोचकांसाठी विशेष आसन व्यवस्था, खेळाडूंचे पव्हेलियन व इतर सर्व व्यवस्था उच्च दर्जाच्या आहेत. याशिवाय गरजू व्यावसायिकांसाठी स्टाॅल्सही निर्माण करण्यात आले आहेत. या मैदानावर गेल्यावर एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर असल्याचा भास होतो, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
या जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू असून भविष्यात भारतीय संघात येथील खेळाडून निश्चितच जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले की, या आयोजनासाठी मदत करणारे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाचे आम्ही विशेष आभार मानतो. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे ही उच्च दर्जाची स्पर्धा आयोजित करता आली. भविष्यात केवळ क्रिकेटच नव्हे तर इतर क्रीडा प्रकारातही जिल्ह्यातील खेळाडूंचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. एस. खंडवावाला , निवासी संचालक सेवानिवृत्त कर्नल विक्रम मेहता, बलराम (भोलू) सोमनानी, रोहित तोंबर्लावार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ११ लाख ११ हजार १११ रुपये राहणार आहे, द्वितीय बक्षीस ७ लाख, तृतीय बक्षीस ५ लाख व चौथे पारितोषिक २ लाख रुपये आहे. लीग मॅचमधील सामन्यात मॅन ऑफ द मॅच २५ हजार रुपये, क्वार्टर फायनल सामन्यात ५० हजार रुपये, सेमी फायनल सामन्यात ७५ हजार रुपये व फायनल सामन्याततील सामनावीराला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रीमियर लीगमधील दहा ते १२ उत्कृष्ट खेळाडूंना राजस्थान रॉयल्स अकादमीत प्रशिक्षणाकरिता कंपनीतर्फे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यातील गुणवंत व होतकरू क्रिकेट खेळाडूंकरिता सोनेरी भविष्याची संधी ठरणार आहे. एमआयडीसी मैदानावर आयोजित या स्पर्धेला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती होती. सर्वत्र आनंदाचे, चैतन्याचे वातावरण होते. ख्यातनाम समालोचक, उत्कृष्ट निवेदिका, चिअर लिडर्स, नृत्याचा ठेका धरायला लावणारे संगीत अशी सगळी व्यवस्था असल्याने ही स्पर्धा अधिकच दैदिप्यमान झाली. बुधवारपासून प्रारंभ झालेली ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत जात प्रेक्षकांना उत्कृष्ट क्रिकेटचा आनंद देणार आहे.