पर्यटन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना प्रस्तावित करा:वार्षिक योजनेच्या आढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

गडचिरोली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि रोजगारनिर्मिती यासंदर्भात नाविन्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले. विशेषतः “क” वर्ग पर्यटन स्थळांमध्ये टिपागड, झाडापापडा, सिरोंचा त्रिवेणी संगम, कमलापूर हत्ती कॅम्प, लेखामेंढा, चपराळा अभयारण्य, अरततोंडी महादेव, कोठारी बौद्ध स्तूप, तुमडी, आष्टी येथील निसर्गरम्य परिसर आणि मुतनूर या अकरा ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देऊन पर्यटकांना अधिक आकर्षित करण्याचे व त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ चा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेस चालना देणारे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याचे सांगून रेशीम शेती, मध उत्पादन, डेअरी उत्पादन आणि हिरडा, बेहडा, चारोळीसारख्या वनउपजांवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वेळेत खर्च करण्याचे सांगितले.
बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.